सिंधुदुर्ग हा रमणीय सौंंदर्याने नटलेला निसर्गरम्य जिल्हा आहे. या जिल्हयात आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ, फणस व करवंदे अशी विविध फळे व समुद्रातून अनेक जातींंचे चवदार मासे उपलब्ध होतात. नैसर्गिक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही हा जिल्हा आर्थिक दृष्टया दुबळा आहे. उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे महिलांना तसेच बेरोजगारांना नवीन उदयोग किंवा रोजगार मिळावे हा या उपक्रमामागचा हेतू आहे. सिधुंदुर्ग जिल्हयातील महिलांच्या जीवनात या संस्थेच्या माध्यमांतून आर्थिक उत्क्रांती होत आहे. महिलांचा सर्वांगीण विकास व महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम बनविणे हे या जिजाई महिला संस्थेचे ध्येय धोरण आहे.
कुटुंब सुखी होण्यासाठी कुटुंबातील महिलांचा आर्थिक विकास होणे आवश्यक आहे. महिला व महिलांच्या माध्यमातून जिल्हयातील प्रत्येक कुटुंब सुखी व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला जात असून संपूर्ण देशातील एक नावीन्य पूर्ण असा हा उपक्रम आहे. महिलांनी या संस्थेमध्ये यावे, हा उपक्रम पहावा, मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, बचतगट व त्या माध्यमातून लघू उदयोग उभारावे, उदयोगांच्या माध्यमांतून उत्पादन घ्यावीत, मार्केटिंग करावे, पैसे मिळवावे व कुटुंबाला भरीव हातभार लावावा हाच या संस्थेचा हेतू आहे.