'माननीय नारायण राणे साहेबांचे समृद्ध सिंधुदुर्गचे स्वप्न साकार करण्यासाठी मी जिजाई महिला बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत आहे. महिला सक्षम झाल्या तरच जिल्ह्याला आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल आणि आपण सर्वांनी बचत गटाच्या माध्यमातून या विकास प्रक्रियेत समरस होऊया' असे आव्हानात्मक प्रतिपादन जिजाई महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष निलमताई राणे यांनी केले.
कणकवली शहरातील महिला बचत गटांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत सभागृहात झाला. शहरातील बहुसंख्य महिला आपल्या गटांची विविध उत्पादने घेऊन उपस्थित राहिल्या होत्या. जेव्हा स्वतः महिला स्वयंरोजगारातून स्वावलंबी बनतील, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना रोजगाराचे महत्त्व निश्चितच पटेल ; त्यातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीकडे तरुण-तरुणींचा ओढा वाढेल व समृद्ध सिंधुदुर्ग होण्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढेल आणि नारायणराव राणे यांच्या स्वप्नातील सिंधुदुर्ग उभा राहील. त्या सिंधुदुर्गाच्या निर्मितीचा खारीचा वाटा आपण महिलांनी उचलू या असे आवाहन यावेळी निलमताई राणे यांनी केले.